त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे ऑफिस ला निघाले. सकाळची घरातली कामं उरकून माझी जुनी स्कुटी घेऊन निघाले. माझा स्कुटीवरचा प्रवास घरापासून ते घोरवाडी रेल्वे स्टेशन पर्यंतचा फक्त १ ते १.३० किमी असायचा. माझी स्कुटी म्हणजे जोरात न पळणारी आणि ब्रेक न लागणारी. कशीबशी स्कुटी घेऊन गेले आणि मावशींच्या घरी लावली. प्लॅटफॉर्म ला पोहोचले आणि गाडी नेहमीप्रमाणे लेट! सकाळी पावणे नऊ ची लोकल म्हणजे गर्दीच. मग मी तिथे मला भेटणाऱ्या रोजच्या मैत्रिणीं सोबत गप्पा मारत बसले. गप्पा मारता मारता गाडी कधी आली कळलेच नाही. गाडी आली कि कोण आधी चढणार अशी आमची घाई. बरं गाडीत चढले पण आत गर्दी बघून बसायला जागा शोधण्याची घाई.
दोन स्टेशन गेल्यानंतर मला बसायला जागा मिळाली (third seat) नाहीतर फोर्थ सीट म्हणजे दुसऱ्या दिवशी पासून एकाच पायावर चालायची सवय करायची. आता बसायला जागा मिळाली तर काहीतरी उद्योग नको का? शेजारणीशी गप्पा मारा, समोर उभी असलेल्याची बॅग धरा, काकूंनी विकायला आणलेले कानातले बघा आणि मोबाईल वर गाणी ऐका. मी आपली मोबाईलवर मेसेजेस वाचत बसले. तेव्हढ्यात समोर बसलेल्या दोघींचं बोलणं कानावर आलं. त्या दोघी साधं राहणीमान आणि थोड्या फार शिकलेल्या वाटत होत्या. एका बाई ला चिंटू चित्रपटातलं बालगीत हवं होतं. दुसरी बाई तिच्या मोबाइल मध्ये ते गाणं शोधू लागली. तिला कोणीतरी ते गाणं मोबाईल मध्ये सेव्ह करून दिलं होतं. दोघीही बराच वेळ ते गाणं शोधत होत्या. मनात विचार आला कि माझ्या मोबाइल मध्ये हे गाणं आहे. देऊ का मी त्यांना? पण मी विचार केला कि, मी जर हे गाणं त्यांना पटकन दिलं तर त्यांचं काम सोप्प! देऊ कि नको करता करता माझं स्टेशन जवळ आलं. मी गप्प राहिले, आणि त्यांना ते शोधू दिलं. एकमेकींच्या मदतीने नंतर त्यांना ते सापडलं आणि मोबाईल मधे शेअर सुद्धा केलं. थोडफार मोबाइल मधल आपल्याला कळतं आणि त्यातली सिस्टिम वापरता येते याचा त्यांना आनंद झाला होता. एखाद खेळणं बाळाच्या हातात दिलं कि त्याचा वापर कसा करायचा हे त्यानं ठरवावं. एक उत्तर शोधताना आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टीही कळतात. यातूनच आपण पुढे जातो. बघा, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हे खरंय. शिका आणि शिकवत राहा.
